मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रबळ दावेदार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी अखेर ‘एमआयएम’ची वाट धरली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार Imtiaz jaleel यांच्या उपस्थितीत गुरुवारी येथील खैबान निशाद चौकात होणाऱ्या जाहीर सभेत मौलाना मुफ्ती समर्थक, वीसपेक्षा अधिक नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ‘एमआयएमम’ध्ये प्रवेश करतील. प्रवेशाबरोबरच मध्य विधानसभेतून ‘एमआयएम’तर्फे त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे.
हज यात्रेला जाण्यापूर्वी मौलाना मुफ्ती यांनी तीन तलाकप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. यात्रेहून परतल्यानंतर आपण भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले होते. येथे परतताच त्यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. नंतर एमआयएममधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ‘एमआयएम’चे मालेगाव महानगराध्यक्ष मलिक युनूस ईसा, त्यांचे बंधू स्थायी समितीचे सभापती डॉ. खालीद परवेज यांनी ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांना याबद्दल माहिती दिली.
मौलाना मुफ्तींच्या प्रवेशाला त्यांनीही संमती व दुजोरा दिला. खैबान निशाद चौकात गुरुवारी होणाऱ्या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन ‘एमआयएम’ने केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख व ‘एमआयएम’- वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. मौलाना यांच्या रुपाने राज्यातील एक प्रमुख वक्ता व मोहरा ‘एमआयएम’च्या गळाला लागला आहे. (सोर्स – सरकारनामा)
Loading…